पुणे : जन्मदाता, आजोबा आणि चुलत्याकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ४ वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी (पुणे) परिसरात घडल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी ४९ वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे. कॉलेजमधील गुड टच बॅड टचच्या समुपदेशनामुळे वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. त्यांची घराची परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवले होते. त्यामुळे २०१६ ते २०१८ ही दोन वर्ष मुली उत्तर प्रदेशात रहायला होती. याच दरम्यान ३३ वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीच्या आजोबांनी देखील तिचे चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. त्यानंतर २०१८ मध्ये ती मुलगी पुण्यात आली. त्यावेळी आईवडिलांना तिने पत्र लिहून हा प्रकार कळवला होता. मात्र त्यानंतर वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आई काही कारणास्तव बाहेर गेली असता वडील तिच्यावर अत्याचार करीत होते.
दरम्यान, पिडीत अल्पवयीन मुलीच्या कॉलेजमध्ये समुपदेशनाचा तास सुरु होता. तेव्हा वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला आहे. याप्रकरणी जन्मदाता, आजोबा आणि चुलत्याच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.