पुणे : बंगळूर येथे पाच दिवसापूर्वी डॉ. महिलेनी ४ वर्षाच्या दिव्यांग मुलीला चौथ्या मजल्यावरून टाकून दिल्याची घटना ताजी असतानाच, अवघ्या १० महिन्याच्या मुलाचा किरकोळ कारणावरून काकाने खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.६) उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी काकाला अवघ्या काही तासाच्या आत अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. तर काकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
शलमोन मयूर सोनवणे असे मृत्यू झालेल्याचिमुकल्याचे नाव आहे. तर अक्षय मारुती सोनवणे (रा. दत्तनगर कोडोली, ता जि सातारा) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा एमआयडीसी परिसरातील दत्तनगर कोडोलीत १० महिन्यांचे बाळ विहिरीत मृतावस्थेत शानिवारी (ता. ६) सकाळी आढळून आले होते. स्थानिकांच्या मदतीने चिमुरड्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस तातडीने घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, विहिरीत सापडलेले बाळ हे मयूर मारुती सोनवणे यांचे असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांना माहिती मिळाली कि, मयूर सोनवणे यांचा सख्खा भाऊ अक्षय सोनवणे हा बाळाला चॉकलेट देतो, असे सांगून घरातून घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने बाळाला विहिरीत टाकून खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अक्षय सोनवणे याला ताब्यात घेतले.
आरोपी अक्षय सोनवणे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, घरातील आईवडील त्रास देतात, तर भाऊ मयूर यांना चांगली वागणूक देतात या क्षुल्लक कारणावरून अक्षय याने भावाच्या मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केला आहे. अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून अक्षय सोनवणे याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, बंगळुरू येथे दिव्यांग मुलगी आपल्या करिअरच्या आड येत असल्याच्या कारणाने चक्क जन्मदात्या डॉ. आईने मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुषमा भारद्वाज अटक करण्यात आलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुषमाचा पती किरणने तिच्याविरोधात तक्रार दिली आहे.