लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, भावडी तसेच परिसरात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या अभिलेखावरील २१ वर्षीय सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय-२१ रा. जाधव वस्ती, भावडी रोड, वाघोली) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार रोहित चव्हाण याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बेकायदेशीरिता शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोपी रोहितवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे गरजेचे होते.
त्यामुळे लोणीकंद पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ यांच्याकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. हे आदेश २६ जून २०२४ पासून पुढील दोन वर्षाकरिता आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव यांनी केली.