पुणे : मागणीप्रमाणे कच्चा माल व कागद पुरविण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाला ९१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मान रशिद शेख (रा. लँडमार्क एम्पायर कन्स्ट्रक्शन, केदारीनगर, वानवडी), आतिक उस्मान शेख, आसिफ शेख, जिलानी नजीर सुभेदार (रा. हांडेवाडी) सनी सुभाष खानविलकर (रा. हांडेवाडी), राहुल सखाराम लांडगे (रा. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नरेंद्र पंडीतराव पाटील (वय ४४, रा. पंचवटी, पाषाण) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डब्ल्यु वेस्ट कॉर्पोरेशन ही फर्म आहे. त्यांच्या ओळखीचे उस्मान शेख यांनी इतरांच्या मदतीने त्यांच्या फर्मला कच्चा माल व कागद पुरविण्याचे आश्वासन दिले. आरोपीच्या मुनलाईट फर्मच्या माध्यमातून हा माल पुरविणार असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
कच्चा माल पुरविण्याच्या बदल्यात त्यांच्या ९१ लाख ५४ हजार ६९१ रुपये रोख तसेच ऑनलाईन घेतले. मात्र, त्यानंतरही त्यांनी कोणताही माल पुरविला नाही. फिर्यादी यांनी अनेकदा मागणी केल्यानंतरही त्यांचे पैसे परत न केल्याने शेवटी त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.