पुणे : कर्वेनगर येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावरून झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. भारतात जमीन घ्यायची असल्याचे सांगून ऑनलाइन ९ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोबाइल नंबरसह बँक खातेधारकांविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्वेनगर येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२३ मध्ये कर्वेनगर येथील एका ४३ वर्षीय सोशल मीडिया अकाउंटवर विल्सन रोज नामक या महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. विल्सन नामक महिलेने ती अमेरिकेत रिअल इस्टेट व्यावसायिक असल्याचे सांगत भारतात गुंतवणूकीच्या उद्देशाने जमीन घ्यायची असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर महिलेने त्यांना अमेरिका ते दिल्ली असे विमान तिकीट पाठवत, मी येत आहे असे सांगितले.
त्यानंतर विनय कुमार नामक व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून दिल्ली विमानतळावरील कस्टम मधून बोलत असल्याचे सांगितले. विल्सन रोज नामक महिला भारतात आली असून, तिच्याकडे ५ लाख पाऊंडचा चेक सोबत आहे. तिच्या बॅगेज क्लिअरन्ससाठी ७५ हजार ५०० रुपये भरण्याचे सांगितले, त्यानंतर दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान इन्शुरन्ससाठी म्हणून ३ लाख ७५ हजार रुपये भरण्याचे सांगितले.
५५ हजार रुपये हॉटेलचे बील आणि अन्य कस्टम ड्युटी वगैरे थापा मारत फिर्यादी यांच्याकडून ९ लाख ९४ हजार रुपये उकळले. त्यानंतर जेव्हा ५ लाख भरण्यासंदर्भात फिर्यादींना फोन आला, त्यावेळी त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेडगे करत आहेत.