पुणे : “आईला नका ना मारु पप्पा!”, असे म्हणत हात जोडून विनंती करणाऱ्या ८ वर्षाच्या चिमुकलीवर जन्मदात्याने गोळी झाडल्याची धक्कादायक घटना नऱ्हे येथील रुद्रांगण सोसायटीत शुक्रवारी (ता.२३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग तुकाराम उभे (वय – ३८, रा. रुद्रांगण सोसायटी, नऱ्हे,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे (वय-८) असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. उभे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमी ते दारू पितात. उभे हे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत धुंद होऊन घरी आले . त्यानंतर पत्नी व घरातील इतरांसोबत वाद घालू लागला. तुमच्यामुळे मला बाहेरच्या लोकांचा मार खावा लागतो, आज तुम्हाला संपवून टाकतो, असे म्हणत त्याने कमरेला लावलेला परवानाधारक पिस्तूल बाहेर काढले. आणि पत्नीच्या अंगावर रोखले.
दरम्यान, आईचा जीव धोक्यात असल्याचे पाहून आठ वर्षांची राजनंदिनी ओरडत आली. “आईला नका ना मारु पप्पा!”, अशी विनवणी करीत होती. मात्र निर्दयी बापाने कोणताही विचार न करता राजनंदिनीवर गोळी झाडली. यात ती गंभीर जखमी झाली आहे. आणि तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, पोलीस निरीक्षक शैलेश संखे, जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, अस्मिता लाड, अशोक सणस आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी राजनंदिनी ला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आले आहे. तर आरोपी पांडुरंग उभे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.