पुणे : जमीन खरेदी प्रकरणी हिंजवडीत राहणाऱ्या एका तरुणाची सात लाखांची फसवणूक गुडवीन सिटी जमीन खरेदी विक्रीच्या मालकांनी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पूर्णचंद्र सनातन स्वाईन (रा. हिंजवडी, पिंपरी) असे फसवणूक केलेल्या गुडवीन सिटी जमीन खरेदी विक्रीच्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिरीष शिवाजी रेडकर (रा. हिंजवडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरीष रेडकर यांचा आरोपी पूर्णचंद्र याच्याशी मावळमधील चांदखेड येथील गट क्रमांक. ४८५ मधील २४०० स्केअर फूट जमिनीसबंधी व्यवहार झाला होता. ती जागा आरोपी पूर्णचंद्र याने स्वतःच्या मालकीची असल्याचं शिरीष यांना सांगितलं होतं. दोघांमध्ये जागे संबंधी ७ लाख ३९ हजारांचा व्यवहार झाला.
दरम्यान, २०१६ पासून अद्याप ही जमिनीचे खरेदी खत आणि रजिस्ट्रेशन झालं नाही. अखेर, शिरीष यांनी मेलद्वारे जमीन खरेदी करायचं नाही अस सांगून व्यवहार रद्द केला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.