लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेत सहा लाखाचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकासह तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखा व्यवस्थापक अभिषेक संपत चोरघडे, रोखापाल सुंगधा बब्बे, लेखनिक अभिजित बनसोडे (सर्व रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सतिश जाधव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक चोरघडे हे उरुळी देवाची येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेत शाखा व्यवस्थापक होते. तेव्हा आरोपी चोरघडे यांनी रोखापाल, लेखनिक यांच्याशी संगनमत करुन एका महिलेच्या नावावर असलेली दामदुप्पट ठेव ठेवल्याची बनावट पावती तयार केली.
त्यानंतर आरोपींनी बनावट पावतीच्या आधारे मुदत संपण्यापूर्वीच पतसंस्थेत जमा करुन व अनिल पवार यांच्या खात्यावरच नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून ती रक्कम अनिल शंकर पवार यांच्या खात्यावर वर्ग केली. व त्यानंतर बनावट विड्राल स्लिपा भरुन खात्यावरुन ६ लाख २० हजार ५०७ रुपये काढून पतसंस्थेची फसवणूक केली. सदर प्रकार हा शाखेत २० जुलै २०२० रोजी घडला आहे.
दरम्यान, अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सतिश जाधव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.