पुणे : पुण्यातील खराडी परिसरात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने चारचाकी गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच एका महिलेवर देखील पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. या गंभीर प्रकारामुळे पुन्हा पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला गुंडांनी केराची टोपली दाखविली आहे का? असं प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून वाद सुरु होता. वाद एवढा विकोपाला गेला की, दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुरवातीला महिलेच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने मोठं अनर्थ टळला. दरम्यान, पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला. या घटनेत चारचाकी गाडीचे सीट जाळून खाक झालं आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. महेश राजे आणि या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्या दोघांमध्ये पार्किंगवरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यांनर १३ जणांनी येऊन राजे यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केले. त्याठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली आहे. महेश राजे यांचे भाडेकरू असलेल्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांनी महिलेच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.