पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या बसस्थानकाजवळ व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ कोटी २८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विजय विठ्ठल ठाणगे (वय – ५६), अक्षय विजय ठणगे (वय – २६ दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे), नवाज अब्दुला कुरुपकर (वय – २४), अजिम महमुद काजी (वय – ५०, दोघे रा. मु.पो. अडखळ, जईकर मोहल्ला, अंजर्ले, ता. दापोली) आणि राजेंद्र राकेश कोरडे (वय – २८, रा. मु.पो. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फर्गसन कॉलेजच्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस व्हेल माशाची कोट्यवधी रुपयांची उलटीची तस्करी होणार आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. पोलिसांना फर्ग्युसन कॉलेज बस स्टॉपच्या मागील बाजूस तीन जण संशयास्पद उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता, व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळून आला. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी सदर गुन्ह्यात विजय ठाणगे आणि अक्षय ठाणगे हे मदत करत असल्याचे सांगितले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करीत आहेत.
दरम्यान, आरोपी राजेंद्र कोरडे याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये २ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळला. याची किंमत २ कोटी ९९ लाख ४० हजार रुपये आहे. तर नवाज कुरुपकर याच्या बॅगेतून २ कोटी २८ लाख ६० हजार रुपये किमतीचा २ किलो २८६ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा जप्त करण्यात आला. तसेच विजय ठणगे याच्या ताब्यातून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा पोलिसांनी तब्बल ५ कोटी २८ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार महेंद्र बोरसे, स्मिता पवार, सचिन गायकवाड, विनय बडगे, स्वालेहा शेख आणि बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.