Pune News : पुणे : विद्येचे माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. याच माहेरघरात तब्बल ४४ जणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची ५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोणी दलाल किंवा भामट्यांनी केलेला नाही, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे आणि त्यांच्या भावानेच केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शैलजा दराडे यांच्याविरोधात हडपसर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता दराडे यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे याला यापूर्वीच अटक झाली आहे.(Pune News)
नोकरीचे आमिष दाखवून त्यांची ५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. शैलजा दराडे आणि दादासाहेब दराडे या दोघांनी मिळून सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांची फसवणूक केली. सुखदेव यांनी नात्यातील महिलेला शिक्षकाची नोकरी देण्यासाठी जून २०१९ मध्ये त्यांनी दादासाहेब दराडे याच्याशी चर्चा केली. दराडे यांनी माझी बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी आहे. मी तुमच्या नातेवाईकांना नोकरी देतो, असे सांगत त्यांच्याकडून हडपसरमधून २७ लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी ४४ जणांनी तक्रार केल्यानंतर शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे.(Pune News)
दरम्यान, अशाच प्रकारे दादासाहेब दराडे यांनी अनेकांचे पैसे घेतले. पैसे देऊन अनेक महिने झाले. पण कोणालाही नोकरी मिळाली नाही. सूर्यवंशी यांनी पैसे परत मागितले. परंतु दराडे यांनी पैसे दिले नाही. यामुळे त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. दादासाहेब दराडे यांना यापूर्वीच अटक झाली तर आता शैलजा दराडे यांना ७ ऑगस्ट रोजी अटक झाली.(Pune News)
विद्येच्या माहेरघरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणात शिक्षण क्षेत्रातील मोठ्या पदावरील अधिकाऱ्याला अटक झाल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.(Pune News)