पुणे : कंपनीत उप कंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची ४७ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा पुण्यातील मिलीयन्स स्टार बिल्डींग (रूबी हॉस्पीटल शेजारी, ढोले-पाटील रोड, पुणे) येथे ऑक्टोबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ याकालावधीत घडला आहे.
प्रतित अशित शाह आणि क्रितीका अशित शाह (रा. सर्व्हे नं. ५/१ अ, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी राजु बबन काकड (४५, रा. सी १३, प्रभा आनंद संकुल, धोंगडे मळा, नाशिक रोड, नाशिक) यांनी नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हा हा आता कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतित शाह आणि क्रितीका शाह यांनी फिर्यादी यांना टेराफर्मा सुपरस्ट्रक्ट एलएलपी कंपनीचे भागीदार आहेत. व टाटा कंपनीचे ५५ कोटी ५८ लाख ४७ हजार ४५१ रूपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे असे खोटे सांगितले होते. आणि बनावट कागदपत्र दाखवुन फिर्यादी काकड यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांना सब कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम देण्यासाठी शाह यांनी ६३ लाख ४० हजार ४१ रूपये घेतले. त्यातील १६ लाख परत दिले आहेत. तर ४७ लाख ४० हजार ४१ रूपये परत न देता फसवणूक केली आहे.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.