सुरेश घाडगे
परंडा : जास्तीच्या दराने धान्य खरेदी करतो असे आमिष देऊन शेकडो शेतकऱ्यांचे ३ कोटी ४१ लाख ४२ हजार रुपयांचे धान्य खरेदी करून पैसे न देता फरार झालेला मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास बुलडाणा पोलिस पथकाने परंडा पोलिसांच्या मदतीने बावची येथून ( दि.१४ ) अटक करून उकिरड्यात पुरून ठेवलेली तब्बल ४२ लाखाची रोकड व कार जप्त केली आहे .
या बाबत बुलढाणा जिल्हयातील चिखली व परंडा पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, यातील मुख्य आरोपी संतोष बाबुराव रानमोडे हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील मुळचा रहाणारा आहे.तो शेतकऱ्यांना फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संतोष रानमोडे याचे बुलढाणा जिल्हयातील चिखली येथे पावित्रा ट्रेडींग कंपनी नावाचे धान्य खरेदी आडत दुकान होते
संशयित आरोपी संतोष रानमोडे याने अशोक समाधान म्हस्के , निलेश आत्माराम सावळे यांच्या मदतीने चिखली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना जादा दराने धान्य खरेदीचे आमीष देऊन शेतकऱ्याकडून हरभरा , सोयाबीन , तुर व भुईमुंग शेंगा असे शेकडो क्विंटल शेततमाल खरेदी केला व बँक खातेवर ऑनलाईन पैसे देतो अशी थाप शेतकऱ्यांना मारली.
मात्र शेतकऱ्यांना पैसे न देता घेतलेला माल विकुन तिघे आरोपी फरार झाले होते. पैसे खात्यावर न अल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.या प्रकरणी सुनिल लक्ष्मणराव मोडेकर यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिल्याने मुख्य अरोपी संतोष रानमोडे, अशोक समाधान म्हस्के व निलेश सावळे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपी विरुद्ध चिखली पोलिसात १६१ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत .
आरोपी फरार झाल्याने बुलडाणा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया , अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त , उपविभागीय पोलिस आधिकारी सचिन कदम , आर्थिक गुन्हा शाखेचे पोनि अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोनि अशोक जायभाये , सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक शारद डोईफोडे ,पोहेकॉ रामेश्वर मुंढे , पोहेकॉ सरदार बेग यांच्या पथकाने मुख्य आरोपी संतोष रानमोडे याच्या तपासासाठी परंडा येथे दाखल झाले होते.
पोनि सुनिल गिड्डे, पोना बळीराम शिंदे , माहिला पोना पायाळे , पोलिस आमलदार यादव यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन दि . १४ जुलै रोजी परंडा तालुक्यातील बावची येथून मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास त्याच्या बावची येथील मावस भाऊ संजय रोडगे यांच्या घरातून अटक केली आहे .तसेच उकीरड्यात पुरुन ठेवलेले ४२ लाख ११ हजार ९२० रुपयाची रोकड व लपवुन ठेवलेली कार जप्त केली आहे .
आरोपीस घेऊन चिखली पोलिस दि . १४ जुलै रोजी चिखलीला रवाना झाले आहेत .बुलडाणा जिल्हयातील व तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पवित्रा ट्रेडिंग कंपणीमध्ये माल घातला आहे, अशा फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी चिखली पोलिस ठाण्यात जबाब नोंदवावा .असे अवाहन बुलडाना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक यांनी केले आहे .