बारामती : मोलमजूरी करणाऱ्या आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही. म्हणून नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षाच्या मुलाने नैराश्यातून गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कऱ्हावागज (ता. बारामती) येथे गुरुवारी (ता. २९) संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता ९ वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. तर शुभमची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. शुभमने आपल्या आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र, घरची परिस्थिती हलाकीची असल्याने आई मोबाईल घेवु शकली नाही, म्हणून शुभमने नैराश्यातुन घराच्या बाजुला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर (वय २७), रा. क-हावागज, लष्करवस्ती (ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.