पुणे – दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका ग्राहकाने ज्वेलर्सच्या दुकानातील ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना देहूरोड येथील मेन बाजारापेठेत असलेल्या कांचन ज्वेलर्स या दुकानात मंगळवारी (ता.७) दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी प्रदीप कुमार कांतीलाल पारेख (वय ५४, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पारेख यांचे देहूरोड मेन बाजारात कांचन ज्वेलर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी (ता.७) दोन वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पारेख यांच्या दुकानात सोने खरेदीसाठी आला होता. त्याने साडेसात तोळे वजनाचे ४ लाख रुपये किमतीचे कानातील दागिने दाखवण्यास सांगितले.
दरम्यान, पारेख यांनी दागिने दाखवले असता त्या व्यक्तीने पारेख यांची नजर चुकवून हातचलाखीने ते दागिने चोरून नेले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.