पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. विवाहाच्या आमिषाने तरुणीची ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुणीने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर तरुणाने तरुणीशी ओळख वाढविली. विवाह करण्यास उत्सुक असल्याचे सांगून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीला वेगवेगळी कारणे सांगून त्याने तिच्याकडून पैसे घेतले. तरुणीने तीन बँकांच्या खात्यात वेळोवेळी ४ लाख १० हजार रुपये जमा केले.
आरोपीच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर तो वापरत असलेले चार ते पाच मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल दिली. सायबर पोलिसांनी संबंधित गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने अधिक तपास करत आहेत.