पुणे : व्यावसायात आर्थिक गुंतवणुकीत अत्यंत कमी कालावधीत दरमहा २० टक्के आर्थिक मोबदला देण्याच्या आमिषाने एक महिला पोलीस कर्मचारी व तिच्या पतीने एका व्यावसायिकाला तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
महिला पोलीस कर्मचारी ज्योती शंकर गायकवाड (वय-५०) व तिचे पती शंकर लक्ष्मण गायकवाड (वय ५४, दोघे रा. रास्ता पेठ) अशी फसवणूक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सदाशिव नलावडे (वय-५२, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गायकवाड पती -पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव नलावडे यांचा चारचाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे. ज्योती गायकवाड या सध्या पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूकीला आहे. गाड्याच्या दुरुस्तीसाठी गायकवाड फिर्यादी यांच्याकडे येत होते. त्यातून त्यांचा परिचय झाला होता. २०१९ मध्ये आरोपींनी नलावडे यांच्या कार्यालयात येऊन त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास सांगितले. तुम्ही गुंतवलेल्या पैशाने नविन इन्होवा किंवा नवीन चारचाकी गाडी घेऊन व तुमच्या आर्थिक गुंतवणुकीपोटी अत्यंत कमी कालावधीत तुम्हाला दरमहा २० टक्के आर्थिक मोबदला आम्ही देऊ असे सांगितले.
पोलीस आमच्याच गाड्या वापरतात, असे म्हणून त्यांनी मोठ् मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना मुद्दामहून फोन लावून आपण कोणा कोणास कसा त्रास देऊन कसे पैसे वसुल केले, याची माहिती दिली. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांना वेळोवेळी १९ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ पासून गायकवाड हा त्यांना टाळू लागला. त्याने कबुल केल्याप्रमाणे नवीन गाड्या घेतल्याच नाही, असा संशय आल्याने फिर्यादी त्याच्या घरी गेले.
दरम्यान, वारंवार पैसे मागूनही पैसे दिले नाहीत. दिलेले सर्व धनादेश परत आले. त्यानंतर सदाशिव नलावडे यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांनी तक्रार न घेतल्याने शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.