लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन ट्रॅव्हल्स व एक सिमेंट वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनोवेरा शाळेजवळ शनिवारी (ता. 04) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी दोन्ही ट्रॅव्हल्स गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी साईकिरण शिरुपसंख्या सिम्मारप्पो (वय-३९ चंदा चित्याला, बनपर्णी, महबुबनगर, जि. बनापाती राज्य चालक रा. ५-३. तेलंगना) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबासाहेब नानामाका बोबडे (रा. सातेफळ, ता. केज, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईकिरण सिम्मारप्पो हे लक्झरी बस घेऊन सोलापूर कडून मुंबईच्या दिशेने चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना, त्यांची बस कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनोवेरा शाळेजवळ आली. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या लक्झरीने सिम्मारप्पो यांच्या लक्झरीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर लक्झरी बस चालक बाबासाहेब बोबडे हा पळून गेला.
या अपघातात फिर्यादी सिम्मारप्पो बसची पुढील बाजुची काच, फायबर, हेडलाईट, उजवे बाजुचा आरसा, वायफर, आतील बाजुचे स्टेअरींग ऑईल बॉक्स, पाठीमागील काच, टेललॅम्प तसेच बॉडीचे फायबरचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सिम्मारप्पो यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लक्झरी बस चालक बाबासाहेब बोबडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.