पुणे : कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याच्या आमिषाने भिवंडी येथील एकाने भागीदारासह १३ गुंतवणूकदारांची १७ कोटी ३५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणारी महिला रोहिणी एस धोका (रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून संदीपकुमार भगवानदास गुप्ता (३५, रा. गणेशमंदिर समोर, भिवंडी) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ सप्टेंबर २०२२ पासून ते २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या काळात बिबवेवाडी येथील शुभ मॅनेजमेंट सर्व्हिसेस येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी रोहिणी धोका आणि आरोपी संदीपकुमार गुप्ता यांच्या भागीदारीत शुम मॅनेजमेंट सर्व्हिसेस व स्विच पे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून पेमेंट एग्रीगेटर आणि रिसेलरचा व्यवसाय करत आहेत. आरोपी संदीपकुमार गुप्ता याने फिर्यादी रोहिणी धोका यांना शुभ मॅनेजमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठं परतावा मिळेल असं आमिष दाखवले. पहिले काही दिवस गुंतवणुकीवर परतावा देऊन विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांच्या मार्फत १३ जणांना १७ कोटी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करायला सांगितली. यानंतर आरोपी संदीपकुमार गुप्ता याने गुंतवणूक आणि त्यावरील परतावा बेकायदेशिरपणे पेंमेंट एग्रीगेटरच्या व्यवसायासाठी न वापरता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके करीत आहेत.