पुणे : पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला शीतपेयात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून त्यानंतर त्या अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल १६ लाख ८६ हजार रुपये जबरदस्तीने उकळल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
फहीम नईम सय्यद (वय ३३, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी एका २७ वर्षांच्या तरुणीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर प्रकार विजय लॉज येथे २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तसेच ५ नोव्हेंबर २०२२ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी ही सांगलीतील आहे. पुस्तक घेण्यासाठी ती पुण्यात येत होती. त्यादरम्यान बसमध्ये तिची आणि फहीम सय्यद याच्याशी ओळख झाली. त्याने आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे सांगितले. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यावरुन त्यांच्यात संभाषण होऊ लागले. त्यानंतर पुण्यात येत असताना त्याने तिला फोन केला.
दोघांनी मिळून पुस्तकाची खरेदी केली आणि त्यानंतर जेवणाच्या बहाण्याने तिला बालगंधर्व चौकातील एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिला विजय लॉजवर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ काढले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याने हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्याबदल्यात त्याने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. आपली बदनामी होऊ नये, म्हणून या तरुणीने कर्ज काढून त्याला महिनाभरात 16 लाख 86 हजार रुपये दिले. तरीही त्याची मागणी थांबत नसल्याने तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी फहीम सय्यद याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.