पुणे : पाषाण येथील जमीन बांधकाम व्यावसायिकाला विकसनासाठी देण्यात आली होती. परंतु विकसनाचा करार मोडून बांधकाम व्यावसायिकाची तब्बल १४ कोटी ५० लाखाची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील पाषाण परिसरात सन २००६ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल (वय. ६५, रा. नारंगीबाग रोड, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक शिवनारायण थेपटे (व.७४ ) आणि अमित अशोक थेपटे (वय. ४७, दोघे रा. मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर, पुणे) यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अगरवाल यांनी स्वत: विकसित करण्यासाठी पाषाण येथील जमीन ऑगस्ट २००६ मध्ये घेतली होती. ही जमीन त्यांनी मे. गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. चे संचालक अशोक थेपटे व अमित थेपटे यांना विकसनासाठी दिली होती. जमिनीवर विकसन करुन ५५ टक्के फिर्यादी तर ४५ टक्के आरोपी यांच्या कंपनीला देण्याचे ठरले होते.
संबंधित बांधकामाचा ताबा १५ महिन्यात करुन देण्याचे ठरले असताना आरोपींनी मुदतीत ताबा दिला नाही. त्यामुळे २००७ व २०१० मध्ये फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पुन्हा करार होऊन आरोपींना बांधकामासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही फिर्यादी यांना आरोपींनी ताबा दिला नाही.
त्यानंतर फिर्यादी विजय अगरवाल यांनी एप्रिल २०१६ मध्ये नोटीस पाठवली. सर्व हक्क व पॉवर ऑफ अॅटर्नी संपुष्टात आली असताना आरोपींनी संबंधित हक्क आपल्याकडे असल्याचे दाखवून खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली.
ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्याद्वारे सेवा विकास बँक व धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी यांच्याकडून ३० कोटी ७५ लाख रुपये कर्ज घेऊन फिर्यादी यांच्या हिश्श्याचे ४ कोटी रुपयांचे २५०० स्के फुटाचे दुकान आणि १० कोटी ५० लाख रुपये किंमतीचे १० हजार ५०० स्के फुटाचे ऑफीस न देता १४ कोटी ५०लाख रुपयांची फसवणूक केली.
दरम्यान फिर्यादी यांची फसवणूक झाल्यावर त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अशोक थेपटे व अमित थेपटे यांच्यावर आयपीसी ४२०, ४०६, ४०९ , ४६४ ,४६५ , ४६७ ,४६८ , ४७१ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.