मुंबई : गणेश विसर्जन करताना ११ जणांना विजेचा शॉक लागला असल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील वडघर खाडीत घडली आहे. सर्व जखमींवर खाजगी रुग्णायलात उपचार सुरु असून यामध्ये कुंभारवाडा येथील एकाच कुटुंबातील १० जणांना समावेश आहे.
सर्वम पनवेलकर, तनिष्का पनवेलकर, दिलीप पनवेलकर, निहार चोणकर, दीपाली पनवेलकर, वेदांत कुंभार, दर्शना शिवशिवकर, प्रसाद पनवेलकर, हर्षद पनवेलकर व मानस कुंभार, रुपाली पनवेलकर अशी शॉक लागलेल्या जखमींची नावे आहेत. त्याच्यावर विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडघर खाडी किनारी गणपतीचे विसर्जन सुरु होते. यावेळी विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. या दुर्घटनेत पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील एकाच कुटुंबातील १० जणांना विजेचा शॉक बसला आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी- कर्मचारी, महापालिकेचे उपायुक्त, सर्व अधिकारीवर्ग आदींनी रुग्णालयात धाव घेतली असून अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे. तर या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.