पुणे : बारामतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना कर्जासाठी बनावट आधारकार्ड देत बजाज फायनान्स कंपनीची सुमारे १ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज भोसले, जुबेर पठाण, शेषराव भोसले (तिघे रा. निरावागज, ता. बारामती) व संदीप लालबिगे (रा. हरीकृपानगर, बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कंपनीकडून रिस्क कन्टेन्मेंट मॅनेजर प्रशांत शिंदे (रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ, भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, बारामतीतील गुणवडी चौकात शाहू महाराज कॉम्प्लेक्समधील विजय मोबाईल्स या दुकानाला कंपनीने पोर्टल दिले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये कर्ज व्यवस्थापन समितीने तेथील काही प्रकरणे तपासली, असता ग्राहकांचा मासिक हप्ता वेळेत येत नसल्याचे दिसून आले.
त्यानुसार ग्राहकांनी दिलेल्या पत्त्यावर भेट दिली असता ते तेथे वास्तव्याला नसल्याचे दिसून आले. मनोज भोसलेने ९ ऑक्टोबर रोजी जुबेर पठाण याच्या मदतीने एलईडी टीव्ही खरेदी केला होता. केवायसी दस्तऐवजावर सरडे (ता. फलटण) येथील पत्ता दिला होता. कंपनीने तेथे जात चौकशी केली असता पत्ता चुकीचा निघाला. त्यामुळे दिलेले आधारकार्ड बनावट असल्याचे लक्षात आले. बाकी प्रकरणांच्या चौकशीतही आधारकार्ड बनावट दिल्याचे दिसून आले.
या प्रकरणात मनोज भोसले, शेषराव भोसले व संदीप लालबिगे या तिघांनी एलईडी टीव्ही खरेदी करत कंपनीची १ लाख १० हजारांची फसवणूक केली. जुबेर पठाणने मनोज भोसले याला सहाय्य केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.