पुणे : सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने समाजमाध्यमवर बनावट माहिती पाठवून सीरम इन्स्टिट्यूटला तब्बल १ कोटी १ लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे वित्तीय अधिकारी सागर कित्तुर (वय ४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कित्तूर हे सिरम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून नोकरी करतात. सिरम कंपनीचे सीईओ आदर पुनावाला असून आणि डायरेक्टर म्हणून सतीश देशपांडे हे काम करतात. देशपांडे यांच्या मोबाईलवर सीईओ आदर पुनावाला यांच्या मोबाईलनंबर वरून व्हाट्सअप मेसेज आले. या मेसेजमध्ये काही बँक अकाउंट नंबर देण्यात आलेले होते. या नंबरवर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आलेले होते. देशपांडे यांनी फायनान्स मॅनेजर असलेल्या सागर कित्तूर यांना या नंबरवर पैसे पाठविण्यास सांगितले.
त्यानुसार कित्तुर यांनी विविध खात्यांवर १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविले. या संदर्भात कंपनीमध्ये चर्चा झाल्यानंतर आदर पुनावाला यांनी असा कोणताही मेसेज पाठविला नसल्याचे समोर आले. संस्थेची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या संबंधी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.