सुरेश घाडगे
परंडा : पीएम किसान योजनेचे बंद झालेले खाते चालू करून देतो म्हणून परंडा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना ऑनलाईन सेंटरचा चालक प्रदिप माळी याने शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळीचा तपास करून कडक कारवाई करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने परंडा तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
याबाबत माहिती अशी कि, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी परंडा तहसिल कार्यालयात याबाबत अर्ज केला होता .अर्ज केल्यानंतर काही दिवसानी परंडा कृषी उत्पन्न बाजार समीती समोरील ऑनलाईन सेंटरचे चालक प्रदिप माळी याने शेतकऱ्यांना फोन करून तुमचे पीएम किसान चालू करून देतो असे सांगुन बोलाऊन घेतले . त्यांच्याकडून आधार कार्ड , पॅन कार्ड , सातबारा घेऊन आंगठा घेतला . या कागदपत्राच्या आधारे परस्पर फिनो बँकेचे खाते उघडले व एटीएम कार्डद्वारे शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे काढले .
शेतकऱ्यांनी तहसिलमध्ये चौकशी केली असता तुमचे पीएम कीसान योजनेचे पैसे फीनो बँकेत जमा झाल्याचे सांगण्यात आल्याने काही शेतकऱ्यांनी फीनो बँकेत चौकशी केली असता एटीएमद्वारे पैसे काढल्याचे उघडकीस आले .
याप्रकरणी सिरसाव चे शेतकरी संजय वायकुळे यांनी परंडा पोलिसात फिर्याद दाखल केल्याने प्रदिप माळी व त्याचा सहकारी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिस निरिक्षक अमोद भुजबळ , सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे , पोलिस हवालदार डी . यू पवार यांनी ( दि. ११ ) घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे .परंडा तालूक्यातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची चर्चा होत आसल्याने खळबळ उडाली आहे .शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहे याचा सखोल तपास करावा व दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे .
दरम्यान, पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचे खाते नंबर तहसिल कार्यालयाकडून चुकल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहेत . तर अनेक शेतकरी वंचित आहेत.