शिरूर : गांजेवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळ्यात असलेल्या श्री तुकाई देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मंगळवारी (ता. ०३) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवीचे पुजारी ज्ञानेश्वर गुजाराम मुलमुले यांनी शिरूर पोलिसांत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील गांजेवाडी (माळीमळ्यात) श्री तुकाई देवीचे मंदिर आहे. सोमवारी (त. ०२) संध्याकाळी नेहमीप्रमाणे पुजारी ज्ञानेश्वर मुलमुले यांनी संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास मंदिर बंद केले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुजारी ज्ञानेश्वर मुलमुले देवीची पूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिरातील काही अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
आत जाऊन पाहिले असता तिजोरी, कपाट, देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवीचे डोळे, रोख रक्कम असा सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची निदर्शनास आले. यावरून मंदिरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ त्यांनी गोरक्ष प्रकाश शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी शिरूर पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलीस पथक घटना स्थळी रवाना केले
चोरीची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरासमोर जमा झाले होते. तिसऱ्यांदा देवीची चोरी झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाने या चोरीचा तात्काळ छडा लावण्याची मागणी ग्रामस्थ व माजी सरपंच बबनराव पोकळे यांनी केली आहे. तुकाई देवी मंदिरा शेजारीच असलेले श्री संत सावतामाळी, विठ्ठल रखुमाई मंदिर ही चोरटयांनी ग्रील उचकटून उचकापाचक केली आहे.
दरम्यान, मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असलेले ग्रील तोडून चोरटयांनी मंदिरात चोरी केल्याची माहिती गोरक्ष शिंदे, संजय गायकवाड, रामभाऊ शिंदे, संपत गायकवाड यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.