लोणी काळभोर,(पुणे) : हलक्या दर्जाचे सिमेंट मिक्सिंग करून बनावट सिमेंट बनवून अल्ट्राटेक सिमेंट व बिर्ला सुपर सिमेंट कंपनीच्या गोणीमध्ये भरून कंपनीचे आहे असे सांगून ग्राहकांना विक्री करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिवरुद्र एंटरप्रायझेस अॅन्ड बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स थेऊर फाटा ता. हवेली येथे घडली आहे.
प्रविण दिलीप केंगार, व सुशांत बापुराव केंगार (रा. दोघेही गायकवाड वस्ती थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून टेम्पो, बनावट सिमेंटसह १० लाख ५४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी महेश अर्जुन मुखिया (वय- २५, रा. सह्याद्री नगर मनवेल पाडा रोड, विरार इस्ट, पालघर, ता. जि. पालघर), यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक, कॉपीराइट व ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मुखिया हे टॉर्क डिटेक्टिव्ह कंपनी येथे कामाला आहेत. बिर्ला सुपर सिमेंट यांचे अधिकार पत्राद्वारे कंपनीचा बनावट व मिलावट असलेल्या मालाची पाहणी व तपासणी करून त्यामध्ये संशयित आढळून आल्यास पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे अधिकार आहे. त्यानुसार अल्ट्राटेक कंपनी यांचायाद्वारे माहिती देण्यात आली होती कि, २६ सप्टेंबर रोजीच्या अधिकारपत्राद्वारे फिर्याद दिली होती.
त्यानुसार मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास थेऊर फाटा ता हवेली जि पुणे या दुकानामध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अल्ट्राटेक व श्री कंपनीचे सिमेंटची विशिष्ठ पोती ही विक्री व साठवणुक करण्यास मनाई असताना देखील त्याची स्थानीक पातळीवर विक्री करुन शासनाची व लोकांची दिशाभुल करून फसवणुक करत असल्याचे निदर्शनास आले.
बनावट सिमेंट जमिनीवर ओतत असताना व त्याला खोऱ्याने ढवळीत असलेला दिसून आला. त्यानुसार अल्ट्राटेक सिमेंट नाव असलेली गोनीचा वापर करून मिक्सिंगचा प्रकार सुरु होता. यावेळी मिक्सिंग केलेल्या सिमेंटमध्ये डस्ट पावडर, खराब सिमेंट, व हलक्या दर्जाचे सिमेंट दिसून आले.
त्यामूळे वरील दोघांवर फसवणूक व कॉपीराइट व ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून टेम्पो, बनावट सिमेंटसह १० लाख ५४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुर्व हवेलीतील लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसरसह उरुळी कांचन परिसरात मागील काही दिवसापासून बनावट सिमेंट बनवणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. मोठ्या कंपनीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे सिमेंट मिक्सिंग करून बनावट सिमेंट बनवून नागरिकांना विकले जात असल्याचे प्रकार सध्या जोरदार सुरु असल्याचे चित्र सध्या पूर्व हवेलीत आढळून येत आहेत.
दरम्यान, अशा बनावट सिमेंट विक्री करणाऱ्यामुळे घर बांधून राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे यामध्ये हाल होत आहेत. तसेच पूर्व हवेलीसह परिसरात मोठ्या प्रमाणात बिल्डींग, घर बांधण्याची कामे, सिमेंट रस्त्याची कामे केली जातात. मात्र सिमेंटच बनावट असेल तर यामुळे भविष्यात होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार रहाणार त्यामुळे पोलिसांनी लक्ष ठेऊन कारवाई करावी अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिक करू लागले आहेत.