बारामती : रस्ता ओलांडताना दुचाकी घासल्याच्या वादातून बारामती येथील एका व्यक्तीवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ५ आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा व बारामती पोलीसांनी संयुक्त कारवाई करून बेड्या ठोकल्या आहेत.
तुषार चंद्रकांत भोसले (वय २२, रा. रूई पाटी, बारामती), सुरज राजु काशीद (वय २७, रा. सावळ, बारामती) शुभम विकास राजपुरे (वय २४, रा. राजपुरेवाडी, मुर्टी मोडवे, ता. बारामती), तेजस रतीलाल कर्चे (वय २१ वर्षे, रा. सूर्यनगरी एम.आय.डी.सी., बारामती) आणि विक्रम लालासो बोबडे (वय २६ वर्षे, रा. रूई सावळ, बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गोळीबारात गणेश जाधव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ऋत्विक जीवन मुळीक (वय २१, रा. कुंभरकरवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक मुळीक व त्याचे मित्र तेजस पवार, स्वप्निल भोसले, स्वी माने हे पेन्सिल चौक ते जळोची रस्त्यावरील चाय चस्का दुकानात गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गेले होते. चहा पिऊन तो रस्ता ओलांडत असताना, एक दुचाकी फिर्यादीला घासून गेली. तेव्हा फिर्यादीने गाडी नीट चालवं, माणसांना मारतो का, अशी विचारणा केली.तेव्हा आरोपींनी दुचाकी माघारी आणून त्यातील एकाने ऋत्विक मुळीकला लाथाबुक्यांनी मारहाण केली. मुळीकच्या मित्रांनी त्यांची भांडणे सोडवली, परंतु यावेळी साथीदारांना ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर तेजस पवार याच्याकडून दुचाकीवरून कट मारणारा मुलगा हा तुषार भोसले असून तो शुभम राजपुरे याचा साथीदार आहे. तसेच त्यांची बारामती शहर, एमआयडीसी परिसरात दादागिरी असल्याचे समजले. या घटनेनंतर फिर्यादी मित्रांसह तेथून निघून गेले.
दरम्यान, ऋत्विक मुळीक ही बाब गणेश जाधव याला सांगण्यासाठी ते भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटीजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते गणेश जाधव याला चाय चस्का दुकानासमोर घडलेली घटना सांगत होता. याच दरम्यान तेथे चार ते पाच दुचाकी आल्या. एका दुचाकीवर शुभम राजपुरे बसला होता. तेव्हा शुभम राजपुरे म्हणाला. ‘तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत अजून पैदा व्हायचा आहे’ असे म्हणत पिस्तुलातून गणेश जाधव याच्या दिशेने दोनवेळा फायरिंग केली होती. दुसऱ्या वेळेस केलेल्या फायरिंगमध्ये एक गोळी गणेशच्या पोटात लागली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ऋत्विक मुळीक यांनी फिर्याद दिली आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व बारामती पोलीसांचे ३ पथके नेमून आरोपींना पकडण्यासाठी सूचना दिल्या होत्या. आरोपींचा तपास करीत असताना पोलिसांना गुन्हयातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे हा पिंपरी चिंचवड हद्दीतील एका लॉजवर त्यांच्या साथिदारांसह राहत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी लॉजवरून आरोपी शुभम राजपुरे, तेजस रतीलाल कर्चे आणि विक्रम लालासो बोबडे यांना ताब्यात घेतले आहे. तर बारामती तालुका पोलिसांनी आरोपी तुषार भोसले व सुरज काशीद यांना पकडले आहे.
दरम्यान, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे याच्याविरोधात एकुण १३ गुन्हे दाखल आहे. आरोपीने खुन-१, खुनाचा प्रयत्न- १. दरोडा-१, जबरी चोरी-२, खंडणी-१. अवैध अग्नीशस्त्र बाळगले याबाबत–२, मारामारी-२, चोरी-३ असे गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या भोसरी येथील खुनाच्या गुन्हयात कोरोना कालावधीत सन २०२० मध्ये जेलमधुन रजेवर सुटलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपीविरोधात दाखल असणारे गुन्हयाची माहिती घेऊन आरोपीविरोधात प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश पट्टे, मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, योगेश लगोटे, सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, दडस पाटील, अमित सिट-पाटील, सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, फाशीनाथ राजापुरे, हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षिरसागर, आसिफ शेख, अभिजीत एकशिंग, सचिन पाडगे, स्वप्निल अहिवळे, रामदास बाबर, राजु मोमीन, अजित भुजबळ, विजय काचन, मंगेश बिगळे, निलेश शिंदे, अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, प्राण येवले, धिरज जाधव, दगडु विरकर, राम कानगुडे, नरूडे आणि दराडे यांच्या पथकाने केली आहे.