पुणे : पोलिस निरीक्षक पाटील बोलत असल्याची बतावणी करून बदली करून देण्यासाठी चक्क गुन्हे शाखेच्या पोलिसालाच चक्क पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. मात्र गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पोलिस आयुक्तालयातील गेट क्रमांक तीन समोरून सापळा रचून तोतया पोलिसाला शनिवारी (ता.२१) दहा वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत.
अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५, रा. पुणे ,पूर्ण पत्ता माहिती नाही ) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रुस्तुम मुजावर (वय-४७ ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुजावर हे गुन्हे शाखेत पोलीस कर्मचारी आहेत. मुजावर यांना शनिवारी साडेपाच वाजताच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आहे. पोलिस निरीक्षक पाटील बोलत असल्याचे सांगून तुमची तसेच तुमच्या ओळखीतील व्यक्तीची बदली करायची असेल, तर सांगा असे म्हटले. त्यासाठी पैशाची मागणी करून आरोपी कांबळे याने फोन कट केला.
आरोपीने सांगितलेले नाव आणि त्याच्या बोलण्यावरून तो तोतया असल्याचे मुजावर यांच्या लक्षात आले. आरोपीने पुन्हा रात्री साडेनऊ वाजता मुजावर यांना फोन करून, मला किती वेळ थांबवता, मी पोलिस आयुक्तालयातील गेट क्रमांक तीनवर थाबलो आहे. असे सांगितले.
त्यानंतर मुजावर यांनी वारिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले याना सदर घटनेची माहिती दिली. व कांबळे यांना भेटण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर गेले. त्या वेळी कांबळे याने त्यांना तुम्हीच का मुजावर, असे विचारले. व मुजावर यांनी त्याला कोठे नेमणूक आहे? असे विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दरम्यान आरोपी अमित कांबळे याच्यावर पुणे, नगर, रत्नागिरीसह विविध जिल्ह्यांत २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कारागृहातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. तो गुगल पे दवार पैसे स्वीकारत होता. पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून तो काही कर्मचाऱ्यांची माहिती आणि संपर्क क्रमांक घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.