लहू चव्हाण
पाचगणी : पांचगणी पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर काळे द्रव्य फेकून केलेल्या हल्ल्याचा आज टेबल लँड व्यापारी असोसिएशनने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध केला आहे.
टेबल लँड व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने पांचगणी पोलीस ठाण्याला अशा समाजविघातक प्रवृत्तीवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. हे निवेदन पांचागणीचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद माने यांनी स्वीकारले. यावेळी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे , सेक्रेटरी दिलीप कांबळे ,खजिनदार अनिल वन्ने, सहखजिनदार संभाजी कांबळे, राहुल बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की पाचगणी नगरपरिषदेमध्ये अशा प्रकारची दुसऱ्यांदा झालेली घटना आहे. या पूर्वीही तत्कालीन मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यावरती अशाच प्रकारे घटना घडली होती. तरी वारंवार आपल्या स्वार्थासाठी व त्यामध्ये कोणत्याही जनहिताचा प्रश्न नसताना एखाद्याला टार्गेट करणे ही बाब चुकीची आहे. असा प्रकार करनाऱ्याचा आम्ही निषेध करतो. स्वतःच्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांना धमकी देऊन अशी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला चपराक बसली पाहिजे. या नालायक व्यक्तीमुळे समाजातील चांगल्या लोकांचे नाव खराब होत आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्याला आपण जास्तीत जास्त शासन करावे. अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अजित कासूर्डे म्हणाले, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांना वेठीस धरून आपला स्वार्थ साधणाऱ्या अनमोल कांबळे सारख्या समाजविघातक प्रवृत्तीला पोलीस प्रशासनाने पांचगणीतून तडीपार करावे. अ
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुका कार्याध्यक्ष अतिष भोसले यांनीही जिल्हा पोलिस प्रमुख यांना मुख्याधिकारी यांचेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत पाचगणीत सोयीनुसार पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून उच्छाद मांडून खंडणी उकळणाऱ्या या मनोरुग्णाचा कायमचा बंदोबस्त करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अद्यापही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती पांचगणी पोलिसांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास पांचगणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर करीत आहेत.