राहुलकुमार अवचट
यवत : देऊळगाव गाडा (ता.दौंड) येथील चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल पाच वर्षांपासून चकवा देणाऱ्या एका अट्टल चोरट्याला यवत पोलिसांनी वढाणे (ता. बारामती) येथून बेड्या ठोकल्या आहेत.
सतिश हिरामण शिंदे (वय-२६, रा. वढाणे, भैरवनाथ मंदिरा जवळ ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव गाडा ग्रामपंचायत हद्दीतील एका घरातील रोख रक्कम ४५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना २ ऑक्टोंबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकारणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यवत पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्हाचा तपास करीत असताना, हा गुन्हा आरोपी सतिश शिंदे याने केला असल्याचे समोर आले होते. आरोपी शिंदे हा तब्बल पाच वर्षांपासून चकवा देत होता. सदर पथक आरोपीच्या मागावर होते. पोलीस पथकाला आरोपी वढाणे गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी वढाणे गावात सापळा रचला. आरोपी शिंदेला पोलीस आल्याची चाहूल लागताच, आरोपीने पळ काढला. आणि आरोपी डोंगराळ भागाच्या दिशेने पळून जाऊ लागला, पोलिसांनी तब्बल दोन किलो मीटर पाठलाग करून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, गणेश कुतवळ, पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.