सागर जगदाळे
भिगवण: भिगवण (ता.इंदापूर) पोलीस ठाणे हद्दीतील डिकसळ येथे चोरट्यांनी घराचे कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश करीत महिलांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून साडे सहा लाख रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करीत पोबारा केला. चोरीची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटना स्थळी भेट देत माहिती घेतली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार डिकसळ खानावटे रोडवर राहणाऱ्या राहुल भोंग यांच्या घरी पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास हि घरफोडी करण्यात आली. भोंग यांच्या घरी दोन दिवसापासून दिवाळी सणासाठी नातेवाईक आलेले होते. सोमवारी संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर महिला बेडरूममध्ये तर पुरुष हॉल मध्ये झोपले होते. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी लोखंडी जाळीला असणारे कुलूप तोडून घरात प्रवेश करताना पुरुषांच्या खोलीला कडी लावून महिला असणाऱ्या खोलीत प्रवेश केला.
यावेळी महिलांना जाग येताच चोरट्यांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवीत अंगावरील तसेच कपाटातील जवळपास १० तोळे सोने चोरी करीत पोबारा केला. यावेळी महिलांनी जीवाच्या भीतीमुळे आरडाओरडा केला नाही. मात्र चोरटे घराबाहेर निघाल्यानंतर दुचाकीचा आवाज येताच महिलांनी आरडाओरडा करीत इतरांना जागे केले.
यावेळी शेजारील सर्व खोल्यांना चोरट्यांनी कड्या लावल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.शेवटी या महिलांनी धाडस करून खोलीच्या कड्या उघडल्या. यावेळी चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. याबाबत राहुल लहू भोंग यांनी पोलिसांत तक्रार दिली असून भिगवण पोलिसांनी तपास सुरु करून याठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
गळीत हंगाम सुरु होताच चोरीचे प्रकारात वाढ
भिगवण पोलीस यांच्या समोर या प्रकरणाला हाताळणे हे एक मोठे आव्हान आहे. रात्रभर पोलीस पेट्रोलिंग सुरू असूनही चोरांनी दाखविलेले धाडस हे नक्कीच भिगवण पोलिसांना आव्हान देणारे ठरले आहे. यामुळे या दरोड्याचा सोक्षमोक्ष भिगवण पोलिसांनी लावून दरोडेखोरांना लवकरच अटक केली तरच भिगवण पोलिसांची जरब ही इतर दरोडेखोरांवर ही बसेल. .जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा दरोडा टाकण्याचे धाडस इतर कोणी दरोडेखोर करणार नाहीत.
दरम्यान, भिगवण पेट्रोलिंग सुरू असूनही अशा प्रकारच्या जबरी चोऱ्या होत असल्याने भिगवण परिसरात भीतीचे वातावरण तयार आहे. परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांना अधिक कार्यक्षमतेने कार्यरत राहावे लागणार आहे. असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांची संपूर्ण टीम ही पूर्णपणे चोऱ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील हे करत आहे.