लोणी काळभोर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी हॉटेलजवळ शुक्रवारी (ता.७) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
अभिजीत अभिमन्यू अहेरकर (वय-२१ रा. कन्या शाळेच्या पाठीमागे, लोणी काळभोर ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी अभिजीत अहेरकर हा कवडीपाट टोल नाक्याजवळ येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार राजेश दराडे यांना मिळाली होती. सदर माहिती वरिष्ठांना सांगून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने तडीपार सराईत गुन्हेगारास कुंजीरवाडी परिसरातुन पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी अभिजीत हेरकर याच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीला २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केले होते. अहेरकर याला अटक केल्यानंतर त्याच्या विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ कारवाई केली आहे.
सदरची कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, हवालदार पोलीस अंमलदार राजेश दराडे, दिपक सोनवणे, नितेश पुंडे आणि विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.