दिनेश सोनवणे
दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील (कुरकुंभ ता. दौंड ) हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या दोन सख्या बहिणींना टँकरने धडक दिल्याने एकीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाली असल्याची घटना गुरुवारी (ता. ०४) घडली आहे.
सारीका गोकुळ खोडवे (वय ३०, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर)असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर प्रियंका नवनाथ काळे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी संजय ज्ञानदेव गबले (रा. झगडेवाडी, ता. दौंड) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक सिदप्पा लक्ष्मण देवकाते (वय ५०, रा. राजौरी, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून सारिका व प्रियंका हा महामार्गावरून निघाल्या होत्या. कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील गिरमे वस्ती येथे आल्या असता त्यांना सोलापूर च्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने जोरात धडक दिली. या धडकेत सारिका खोडवे यांना मोठ्या प्रमाणात मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून महिलेच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याने कंटेनर चालकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एम.एस. शिंदे करीत आहेत.