पनवेल : ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने खारघर मधील एका तरुणीला तब्बल ९ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे.
याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांमुळे ते तुटले. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. मात्र, संपर्क होत नसल्याने वशीकरणाचा आधार घेण्याचा तिने प्रयत्न केला.
त्यानंतर तरुणीने रुखसार नावाच्या महिलेशी संपर्क साधला. तरुणीने खानसाहेब जादुई शक्तीने प्रियकराला तिच्यापर्यंत घेऊन येईल असे सांगितले. त्यानुसार तरुणीने खानसाहेबशी संपर्क साधला. खानसाहेबने मागणी केल्यानुसार तरुणीने प्रियकराचा फोटो आणि ५० हजार रुपये पाठवून दिले. वेळोवेळी मागून भामट्याने तरुणीकडून ऑनलाइन ८ लाख ९५ हजारांची रक्कम उकलळी.
दरम्यान, तरुणीने खानसाहेबकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर भामट्याने आपला मोबाइल बंद करुन टाकला. त्यानंतर या तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खानसाहेबविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी भामट्याचा शोध घेत आहेत.