शिरूर – आण्णापूर (ता. शिरूर) येथील मायलेकाच्या खुनाचे गुढ उघडण्यास शिरूर पोलिसांना यश आले आहे. पत्नी व मुलाचा खून करणाऱ्या पतीला शिरूर पोलिसांनी मलठण (ता. शिरूर) येथून अटक केली आहे. यामुळे शिरूर पोलिसांवर नागरीकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
योगेश संभाजी कुऱ्हाडे (रा. पैठण जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णापूर (ता. शिरूर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये एका अज्ञात महीलेचा व तिच्या मुलाचा ८ दिवसांपूर्वी मृतदेह आढळून आला होता. या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस ठाण्यापुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ उकलणे व खरा आरोपी गजाआड करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
दरम्यान, टाकळी हाजीचे सरपंच दामू आण्णा घोडे यांचा स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क असल्याने व त्यांनी या महिलेचे व तिच्या बालकाचे फोटो माहीतीसह स्टेटसला ठेवला होता. या घटनेची माहिती काही बाहेरगावातील कामगारांमार्फत सहाय्यक फौजदार नजिम पठाण यांना कळाली..
त्यानंतर नजीम पठाण यांनी तात्काळ जलद गतीने तपास यंत्रणा राबवून मृत महीलेचा पती योगेश संभाजी कुऱ्हाडे रा. पैठण जि. औरंगाबाद याला मलठण ता. शिरूर येथून फरार असताना ताब्यात घेतले. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नजिम पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.