सागर जगदाळे
भिगवण: भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पिसाटलेल्या एका शिक्षकाने विनयभंग केल्याची लज्जास्पद व गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अजून ताजी असतानाच आता एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना बेलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे घडली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वालचंदनगर (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात भा. द. वि. ३७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल हनुमंत जाधव (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) याला बेड्या ठोकल्या आहेत. तर दोघे अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२० ऑगस्ट) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपी राहुल जाधव याने पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ओमिनी या चारचाकीमधून आलेल्या त्याच्या दोघा साथीदारांपैकी (नाव व पत्ता माहीत नाही) एकाने पीडितेवर जबरदस्ती केली. या दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. त्यानंतर आरोपींनी पिडीतेस ओमिनी गाडीतून इंदापूर बारामती रोडवर असलेल्या एका घरात घेऊन गेले. थोड्यावेळाने त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले.
दरम्यान, विशेष म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या राहुल जाधव याने सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीतून पीडितेच्या घरासमोर येऊन पीडितेच्या आईला जातीवाचक शिवीगाळ व हाताने मारहाण केली. या तिघा नराधमांपैकी मुख्य आरोपी असलेल्या राहुल हनुमंत जाधव याला वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.