बार्शी/सोलापूर : एकीकडे जग महिला दिन साजरा करत आहे, तर दुसरीकडे महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बार्शी पोलिसांची महिलांविषयी दुटप्पीपणाची भूमिका समोर आली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाला आहे.
पीडित मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिल्यानंतर आरोपींना तातडीने अटक न केल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यातील चार जणांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी निलंबित केले आहे. ही कारवाई आज बुधवारी केली आहे.निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्ष आणि एका हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.6)रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर रविवारी (दि.5) दोघांनी अत्याचार केले होते. त्यानंतर मुलीने दोघांविरुद्ध रविवारी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मंगरुळे, महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुल, हेड कॉन्स्टेबल अरुण भगवान माळी अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणे, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई केली जाईल. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगितले. ही कारवाई बुधवारी केली आहे.