युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत येथे अंगणात बसलेल्या महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने हल्ला केला. युवती अंध असून जोरदार पावसात युवतीचा गळा पकडून बिबट्याने दिडशे फुटापर्यंत फरफडत नेऊन रक्तस्त्राव झाल्याने तिच्यात तिचा दुर्दवी अंत झाला. या परिसरातील ही चौथी घटना असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नरभक्षक झालेला बिबट्या जेरबंद झाला नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून वनविभाग झोपा काढते की काय ? असा प्रश्न येथील नागरिक करू लागले आहेत.
येथील पूजा भगवान नरवडे ( वय १९ ) असे मृत पावलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. बीए च्या पहिल्या वर्षात ही युवती शिकत होती. ही युवती अंध असून तिचे शिक्षण घेऊन कलेक्टर व्हायचे स्वप्न होते. दहावीत व बारावीत तिला चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे शिक्षक व ग्रामस्थांनी तिचे कौतूक केले होते. वडील बाहेरगावी गेल्याने ती एकटीच घरी होती. सायंकाळी सात च्या सुमारास घरासमोर ती बसली होती. उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला दिडशे फुटापर्यंत ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात ती…चा आवाज व्यर्थ ठरला. तिच्या आवाजाने शेजारील नागरिकांनी धाव घेतली. तरूणांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन वर्षापुर्वी समृद्धी जोरी ( वय २ ) हिला अंगणात खेळत असताना बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्या बरोबर अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसापुर्वी सचिन बाळू जोरी (वय ३५ ) यांचा ही मृतदेह उसाच्या फडात आढळला. हरीचंद्र वाघमारे ( ६२ ) तर संजय दुधवडे ( वय ३० ) या शेतमजूरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर , पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी आमदार पोपटराव गावडे व माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी घटनस्थळी जाऊन या कुटूंबाचे सात्वंन केले.
वास्तवाला मिळालेला ऊसाचा अडोसा यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. भरदिवसा देखील या परिसरात शेतावर काम करता येत नाही. अनेक घटना घडून देखील नरभक्षक झालेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहे. तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असून नागरिकांचा नाहक बळी जात आहे. बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून केला जात नाही. त्यामुळे यापुढे वनविभागा विरूद्ध आंदोलन करून बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी सांगितले.
बिबट्याच्या ह्ल्यात पुजा नरवडे हिचा अंत झाल्याने गुरूवार ( ता. १३ ) जांबूत ( ता. शिरूर ) हे गाव बंद ठेवून वनविभागाविरूद्ध निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. असे सरपंच दत्ता जोरी यांनी सांगितले.