पुणे: ओळख झालेल्या तरुणाचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबतची माहिती महिलेच्या नातेवाइकांना समजल्यावर त्यांनी या दोघांना समज दिली होती. त्यानंतर महिलेने तरुणाशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने महिलेच्या घरी येऊन तिच्यासह तिच्या अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून पसार झाला. या प्रकरणी सागर सुर्वे (वय ३०, रा. साखरगाव, ता. फलटण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने आरोपीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आरोपी यांच्यात दोन वर्षांपूर्वी इनस्टाग्रामवर ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. ही गोष्ट महिलेच्या एका नातेवाइकास समजली. त्यामुळे त्याने दोघांना समज दिली व प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी महिलेस वेळोवेळी फोन करून तिला भेटायला तिच्या घरी आला. त्यावेळी महिलेने त्यास यापुढे आपल्यामध्ये कोणतेही संबंध ठेवू नको, असे बोलून घरातून पाठवून दिले.
महिलेचा पती कामावर गेला असताना व मुलगा घरी असताना, आरोपी महिलेच्या घरी आला. मुलाने आईला फोन करून आरोपीने तिला घरी बोलवल्याचे सांगितले. त्यानुसार महिला घरी गेली असता आरोपीने तिला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. परंतु, महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या गळ्याला चाकू लावून माझ्यासोबत चल, नाहीतर तुझा जीव घेईल, असे बोलून त्यांच्यात झटापट झाली. यामध्ये चाकू हा महिलेच्या हनुवटीस लागून थोड्या अंतरावर पडला. त्यावेळी आरोपीने सदर चाकू उचलून महिलेच्या मुलाजवळ येऊन महिलेस बोलला की, तुझी मुले आपल्या प्रेमात अडथळा करत आहेत. आता तुझ्या मुलाचा जीव घेतो, असे बोलून चाकूने मुलाच्या गळ्यावर वार करून त्यास जखमी करून आरोपी पळून गेला.