मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घाटकोपरच्या केव्हिके शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात झुरळ आढळून आलं आहे. यावरुन विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणाचा दर्जा राखला जात नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाबही विचारला आहे. तर शाळेतील शिक्षकांनीही माध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
घाटकोपर पश्चिमेला इंदिरा नगर येथे असलेल्या येथील केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात मंगळवारी भातात झुरळ सापडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शाळा शिक्षकांकडे तक्रार केली. शाळा शिक्षकांनीही तातडीने ही बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणली. मात्र, आता पालकांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.