पॅरिस: भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला. मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसळे याने कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसळेचा हा विजय ऐतिहासिक आहे. कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
पदक मिळवल्यानंतर स्वप्निलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पदक जिंकल्यानंतर स्वप्निल म्हणाला, ‘खूप आनंद झाला आहे. अजूनही माझ्या हृदयाचे ठोके वाढलेले जाणवत आहेत. एलिमिनेशन राऊंडमध्ये मी फक्त माझ्या श्वासावर लक्ष केंदित केलं होतं. स्कोरचा विचार मी अजिबात विचार करत नव्हतो. जे इतके वर्ष करत होतो तेच यावेळीही फॅालो केलं. भारतासाठी मेडल जिंकल्याचा आनंद जास्त आहे’.
स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हा स्वप्निलचा प्रेरणास्थान आहे. 2008 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्निल त्याच्यापासून प्रेरित झाला. विशेष म्हणजे बिंद्राचा सामना पाहाण्यासाठी स्वप्निलने बारावीचा पेपरही बुडवला होता. अथेन्स ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानेही स्वप्नीलचं कौतुक केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं नेमबाजीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल खूप आनंद झाल्याचं अभिवन बिंद्रानं म्हटलंय.