पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची मुदत बुधवारी संपली; परंतु रिक्त जागा आणि प्रवेशासाठी मुदतवाढ आवश्यक असल्याने पालकांना ५ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती राज्याचे प्राथमिक संचालक शरद गोसावी यांनी दिली.
आरटीईच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यभरातून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. यापैकी विहित मुदतीत ४० हजार ९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. काही कारणास्तव बहुतांश पालकांना प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आल्याचे गोसावी यांनी सांगितले. दरम्यान, निवड होऊनदेखील ६५ हजार जागांवर पालकांनी प्रवेश घेतलेला नाही. मुदतवाढ दिली तरी जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.