पुणे : गाई आणि म्हशीच्या दूधवाढीसाठी बेकायदा वापरण्यात येणाऱ्या ‘ऑक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीच्या म्होरक्याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून अटक केली आहे.
बाबूभाई उर्फ अल्लाउद्दीन लस्कर (रा. कल्याण, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
औषधाची निर्मिती व वितरण करणाऱ्या टोळीला अंमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पकडले होते. त्यांच्याकडून ‘ऑक्सिटोसिन’ औषधांचा ५३ लाख ५२ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणात समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजित सुधांशू जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपूर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोंडल (वय २२, रा. नबासन कुस्तिया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपूरकूर, मंडाल, २४ परगणा, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली होती.
आरोपींवर त्यांच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आरोपी ‘ऑक्सिटोसिन’ औषधाची निर्मिती करत होते.
या टोळीचा मुख्य सूत्रधार बाबूभाई लस्कर पसार झाला होता. तो मुंब्रा परिसरात असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने बाबूभाईला मुंब्र्यातील अमृतनगर येथून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधे, सचिन माळवे, विशाल दळवी, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.