नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार की दिलासा मिळणार, याबाबतचा निर्णय उद्या, गुरुवारी दुपारी ४ वाजता न्यायालयात होणार आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज म्हणजेच बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. पूजा खेडकर यांच्या वतीने वकील बिमा माधवन न्यायालयात उपस्थित होते, तर यूपीएससीच्या वतीने नरेश कौशिक उपस्थित होते. दिल्ली पोलिसांच्या वतीने अतुल श्रीवास्तव यांनी युक्तिवाद केला.
पटियाला हाऊस कोर्टाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. पटियाला हाऊस कोर्ट उद्या दुपारी ४ वाजता निकाल देणार आहे. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरच्या जामिनाला विरोध करत पूजाला अटकपूर्व जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे पूजाला जामीन देऊ नये. वास्तविक, यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
पूजा खेडकर यांच्यावर काय आरोप?
पूजा खेडकर यांच्यावर वय लपवण्यापासून खोटे अपंगत्व प्रमाणपत्र आणि जातीबाबत खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आरोप आहेत. यूपीएससीची नोकरी मिळवण्यासाठी पूजा यांनी बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे. आता पूजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याचे उत्तर 2 ऑगस्टपर्यंत द्यावे लागणार आहे. भविष्यात त्या आयएएस म्हणून काम करू शकेल की नाही, हे त्यांच्या उत्तरावर अवलंबून असेल. ही नोटीस कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने पूजाला पाठवली आहे. 26 जुलै रोजी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती. पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून वादात आहे. आता पटियाला हायकोर्टातही सुनावणी पूर्ण झाली आहे, फक्त निर्णयाची प्रतीक्षा आहे.