मुंबई : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याबाबत कायदे कडक करुनही घटनांमध्ये अधिक वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील शिवडी परिसरात घडली आहे. एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरात पाच वर्षीय चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी शेजा-याने तिला उचलून स्वत:च्या घरी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी आर ए के मार्ग पोलीसांनी 30 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 65 (2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्याच्या कलम 4,8 आणि 123 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, एका चिमुकलीसोबत असा प्रकार करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.