संतोष पवार
पुणे : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायातुन मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतातील विविध कामांसाठी परंपरागत पद्धतीच्या साधनांचा वापर आता हळूहळू कमी करत आहेत. त्याजागी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या नवीन साधनांचा वापर करून कमी वेळात शेतीची व मशागतीची कामे करण्यावर शेतकरी भर देत आहेत.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसायात लोक गुंतलेले आहेत. पूर्वीच्या काळात बैलजोडी, लाकडी नांगर व इतर परंपरागत अवजारांच्या साधनांच्या साह्याने शेतातील मशागतीची, नांगरणीची कोळपणीची औषध फवारणीची कामे केली जायची. बदलत्या काळानुसार शेती व्यवसायासाठीची नवनवीन तंत्रज्ञान असणारी व अत्याधुनिक प्रणाली असणारी उपकरणे साधने बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्याच अनुषंगाने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पळसदेवनजीक डाळज नं २ येथील प्रगतीशिल शेतकरी विक्रम पांडुरंग पानसरे आपल्या शेतातील मशागतीची, औषध फवारणीची अशी विविध कामे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनच्या सहाय्याने करत आहेत. त्यामुळे आता आमचा कृषीराजा हायटेक होत असल्याचे दिसून येत आहे.
महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आपल्या शेतात पावसामुळे उगवलेल्या गवत व इतर तणांवर औषध फवारणी करण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर करून कमी वेळात शेतीकामे करताना शेतकरी दिसत आहेत. जीपीएस प्रणालीचा वापर करून बनवलेल्या ड्रोनमध्ये बाजारात उपलब्ध असलेली बुरशीनाशके, राऊंड-अप व इतर गवत तण जाळून टाकणारी औषधे व पाण्याचे योग्य प्रमाण यांचे मिश्रण घेऊन कमी वेळात निरुपयोगी गवत तणांवर औषध फवारणी करता येते.
विविध प्रकारची फळझाडे, बागा ऊसाचे पीक व इतर पिकांवर औषध फवारणी या ड्रोनच्या माध्यमातून करता येते. कृषी विभागाच्या शासनमान्य असलेल्या (DGCA) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली असणाऱ्या ड्रोनमध्ये साधारणपणे १० लीटर औषध धारण करण्याची क्षमता असुन त्याचा वापर करून एक एकरात औषध फवारणीला ५ मिनिटे व २० सेंकद इतका कमी कालावधी लागतो. श्रमाचा कमी वापर व अत्यंत अल्प कालावधीत औषध फवारणीची कामे करणे आता सोपे झाले आहे. अशी माहिती प्रगतशील शेतकरी विक्रम पानसरे यांनी पुणे प्राईम प्रतिनिधीशी बोलताना दिली.