-योगेश शेंडगे
शिक्रापूर (पुणे) : शिरुर तालुक्यातील मलठण येथील गावठाणालगत असलेल्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूल शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात सोमवारी (ता.29) सकाळच्या सुमारास मुक्त संचार करणारा बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे परिसरात मुलांसह नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने बिबट्याला जेरबंद केले आहे..
मलठण येथील गावठाणालगत असलेल्या शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात भर सकाळी बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परंतु काही वेळाने सदर बिबट्या ब-याच वेळ एकाच जागेवर बसून राहिल्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनपाल गणेश म्हेत्रे, वन कर्मचारी हनुमंत कारकुड, रेस्क्यू टिम कर्मचारी ऋषिकेश विधाटे, जयेश टेमकर, राजेश वाळुंज, सुदर्शन खराडे, शुभम सिस्तार, सचिन गोडसे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सदर बिबट्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकाच जागी बसून राहिल्याचे दिसून आले.
वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्क्यू टिमने अंदाजे साडेतीन वर्षे वयाच्या नर बिबट्याला जेरबंद केले. त्याला पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.
“मलठण येथे प्रकृती अस्वस्थ्य असलेला बिबट्या मोकळ्या पटांगणात आढळून आला. त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करून, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केले आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरे लावून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.”
– प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी – शिरुर