पिंपरी : लग्नास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा चाकूने गळ्यावर व पोटावर वार करून खून केल्याची घटना महाळूंगे एमआयडीसीतील आंबेठाण येथे घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करून सातारा-कराड रोड येथून आरोपीला अटक केली आहे.
प्राची विजय माने (वय २१, रा. आंबेठाण, खेड, मूळ- इस्लामपूर, वाळवा) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. अविराज रामचंद्र खरात (रा. बहे. ता. वाळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. आंबेठाण येथे मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून झाल्याची माहिती रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करुन प्राचीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाइल फोन देखील सोबत घेऊन तो पसार झाला होता.
अविराज हा दुचाकीवरून सातारा-कराड रोडवरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अविराज याचा १५ किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच अविराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अविराजकडून तीन मोबाईल संच तसेच दुचाकी जप्त करण्यात आली आहे. महाळूंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.