मुंबई : समाजाला एकसंध करण्याची गरज असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते. रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. आता याच मुद्दावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारकवर हल्लाबोल केला आहे.
महायुतीचा सुपडा साफ होणार
महाराष्ट्रात कोल्हापुरात विशाळगडावर जो प्रकार झाला आहे त्यातून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु असून विशाळगडावर जे काही घडलं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एक योजनाबद्ध पद्धतीने घडवली गेलेली दंगल आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा सुपडा साफ होणार असल्याचे सगळ्या सर्व्हेत दिसले आहे. त्यामुळे त्यांना असे प्रकार पश्चिम महाराष्ट्रात करायचे असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हे तर दरोडेखोर आहेत
विशाळगडावर भर पावसातमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली होती. राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांमध्ये फटकारताना भर पावसाळ्यामध्ये कारवाई करण्याची काय गरज होती? अशी विचारणाच अतिक्रमणावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. विशाळगडाची लोक 5 जुलैला पोलिसांना भेटून सांगत होती की, आम्हाला येथे भीती आहे. काहीतरी घडणार आहे. मायबाप सरकारने आम्हाला वाचवावे, असं त्यांचे म्हणणे होते. पण प्रशासनानं त्यांचे ऐकलं नाही. परिणामी ते झालं. विशाळगडावरील दर्ग्याचा खूप जुना इतिहास आहे. तिथे शिवाजी महाराज राहीले होते. तिथल्या गावात पहिल्यांदाच मशिद फोडली, कुराण फाडून फेकून दिलं. तिजो-या फोडल्या. हे तर दरोडेखोर आहेत. असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.